महाराष्ट्रात प्रथम पुणे येथे नोबल हॉस्पिटल्सतर्फे एसएसआय मंत्रा ३ रोबोटिक प्रणाली

SSI Mantra 3 Robotic System

नोबल हॉस्पिटल्स अँन्ड रिसर्च सेंटरमध्ये महाराष्ट्रातील पहिली एसएसआय मंत्रा ३ ( SSI Mantra 3 Robotic System ) रोबोटिक प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. ही एक प्रगत नाविन्यपूर्ण प्रणाली असून शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता आणि कार्यक्षमता सुधारणे हा याचा उद्देश आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद ओक यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. 

याप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स अँन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे, मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपमेंटचे अध्यक्ष सतीश मगर, नोबल हॉस्पिटल्स अँन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. दिविज माने, शल्यचिकित्सक डॉ. उमेश पपुनिया, कर्करोग तज्ज्ञ (आँकोसर्जन) डॉ. आशिष पोखरकर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. या एसएसआय मंत्रा रोबोटिक प्रणालीमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेतील नाविन्यपूर्ण तंत्रांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पाच आटोपशीर रोबोटिक आर्म्स, शल्य चिकित्सक यासाठी अद्वितीय प्रतिमा प्रदान करणारे इमर्सिव्ह थ्रीडी एचडी हेडसेट, संपूर्ण सर्जिकल टीमसाठी ३डी ४के इमेजिंग प्रदान करणारे व्हिजन कार्ट यांचा समावेश आहे. 

नोबल हॉस्पिटल्स अँन्ड रिसर्च सेंटरचे आँकोसर्जन डॉ. आशिष पोखरकर म्हणाले की, ही रोबोटिक यंत्रणा सर्जिकल तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची सुरूवात आहे. या रोबोटिक प्रणालीचा वापर सामान्य शस्त्रक्रिया, हृदय व छातीच्या पोकळीतील विकार (कार्डिओथोरॅसिक), मूत्रविकार, स्त्री रोग अशा अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसह रुग्णांसाठी जीवनदायी प्रक्रिया म्हणून काम करेल. 

नोबल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे म्हणाले की, या तंत्रज्ञानामध्ये छोट्या उपकरणांद्वारे देखील बोटांच्या टोकाच्या आकाराएवढे कमीत कमी छेद केल्यामुळे रूग्ण लवकर बरे होण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. लॅप्रोस्कोपिक आणि खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत या छोट्या उपकरणांच्या हालचालीचे कार्यक्षेत्र अधिक चांगले असते.

रोबोटेक तंत्र विकसित करण्यात डॉक्टरांचे मोठे योगदान – अभिनेते प्रसाद ओक

रोबोटीकची किमया पाहून थक्क झालो आहे. कॉलेजमध्ये असतांना ९० च्या दशकात रोबो डान्सचे फॅड होते. त्यानंतर रजनीकांतचा आलेला रोबोट हा चित्रपट आणि आता वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक प्रणाली हा तंत्रज्ञानाचा प्रवास थक्क करणारा आहे. ही यंत्रणा मी प्रत्यक्षात पहिली व अनुभवली, त्यातील अचुकतेमुळे डॉक्टरांचे काम सोपे होते आणि रुग्णाला होणारा त्रास कमी होऊन डॉक्टरांच्या मनावरील भार हलका होतो. हे तंत्रज्ञान विकसित करून डॉक्टर मोठे योगदान देत आहेत, असे विचार अभिनेते प्रसाद ओक यांनी मांडले.

नोबल हॉस्पिटल्स अँन्ड रिसर्च सेंटरमध्ये महाराष्ट्रातील पहिली एसएसआय मंत्रा ३ रोबोटिक प्रणालीचे उद्घाटन अभिनेते ओक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स अँन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच. के साळे, मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपमेंटचे अध्यक्ष सतीश मगर, नोबलचे संचालक डॉ. दिविज माने, शल्यचिकित्सक डॉ. उमेश पपुनिया, कर्करोग तज्ज्ञ डॉ. आशिष पोखरकर आदी उपस्थित होते.